शासनाचा निर्णय : रेशन दुकानातून आता ऑफलाइन धान्य वाटप

मुंबईतील मुसळधार पावसामुळे राज्यातील धान्य वितरणाचे सर्व्हर तांत्रिक अडचणीत आले आहे. यामुळे जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांतून होणारे वितरण प्रभावित झाले आहे. मागील सात दिवसांपासून जिल्ह्यात धान्य वाटप पूर्णपणे थांबले आहे. तांत्रिक अडचणींमुळे आता ऑफलाइन पद्धतीने धान्य वाटप करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस यंत्रावर अंगठा न लावता देखील धान्य मिळू शकणार आहे.

वितरणाचा गंभीर प्रश्न

ई-पॉस यंत्र सर्व्हरशी कनेक्ट होत नसल्यामुळे धान्य वितरणाची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना धान्य मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पूर्वीसारख्या ऑफलाइन पद्धतीने धान्य वाटप करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रेशन दुकानधारकांनी पुरवठा विभागाकडे केली आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून नागरिकांना स्वस्त धान्य मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंधरा दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्याच्या अन्न धान्य वितरणाच्या सर्व्हरमध्ये पाणी घुसले होते. त्यामुळे पुरवठा विभागाच्या धान्य वितरण प्रणालीमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे धान्य वाटप कसे करावे, हा प्रश्न निर्माण झाला होता. सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड अद्यापही सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थींना अंगठा न लावता धान्य मिळणार आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य

रेशन दुकानातून धान्य वाटप करताना गावातील कुठल्याही विभागाचा अधिकारी किंवा कर्मचारी हजर असणे अनिवार्य आहे. पुरवठा विभागाने यासाठी विशेष फॉर्म तयार केला आहे. लाभार्थ्यांना किती धान्य वाटप केले, याचा हिशोब या फॉर्ममध्ये रेशन दुकानदारांनी भरावा लागेल. रेशन दुकानदारांनी योग्य पद्धतीने धान्य वाटप केले नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

एक महिना थंब (अंगठा) नाही

अखेर शासनाने पुढील एक महिना ऑफलाइन पद्धतीने धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवारपासून रेशन दुकानांवर ऑफलाइन पद्धतीने धान्य वाटप सुरू होईल. पुढील एक महिना धान्य घेताना ई-पॉस यंत्रावर अंगठ्याचा ठसा देण्याची आवश्यकता नाही.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment