Big Breaking: एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6500 रुपयांची वाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Maharashtra ST Employees News : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर, तसेच मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, आणि एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी संप पुकारला होता, परंतु आता त्यांनी आपला संप मागे घेतला आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचारी संघटना कृती समितीसोबत बैठक घेतली. या बैठकीत सर्वांचे लक्ष काय तोडगा निघतो याकडे लागले होते. अखेर या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6500 रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे कोकणात गणपतीसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली. अनेक गावांमध्ये एसटी वाहतूक ठप्प झाल्याने गावकरी आणि विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली होती. आता संप मागे घेतल्यामुळे राज्यभरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आंदोलनामुळे एसटी महामंडळाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आणि एप्रिल 2020 पासून कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, राज्यातील आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असलेल्या विश्रामगृहांच्या दुरुस्तीचे निर्देश दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात यावर भर दिला आणि एसटीच्या महसूल वाढीसाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment